सोमवार, २ डिसेंबर, २०१३

माधव केशव काटदरे



'हिरवे तळकोकण... ' !   ही हिरवीगार कविता लिहिणारे माधव केशव काटदरे यांचा आज जन्मदिवस
माधव केशव काटदरे यांना. (३ डिसेंबर १८९२- ३ सप्टेंबर १९५८ ). काटदरे यांना निसर्गकवीचा मान मिळाला असेल किंवा नसेल... पण ते निसर्गकवी होते, हे निःसशय!! त्या मानाच्या पानात काय वाढलं होतं, हे पाहण्यासाठी आपण काही तिकडे डोकवायला नको.   केवळ असा मान मिळाला म्हणजेच कुणी निसर्गकवी, रानकवी होतो, असे थोडेच आहे?  खरीखुरी, अस्सल, मातीचा गंध शब्दाशब्दांत घेऊन येणारी, हिरव्या पानांचा उग्र-ओला वास ओळीओळीत मिरवणारी कविता लिहिली की झाला तो कवी निसर्गकवी.  एवढे हे साधे-सोपे आहे.   काटदरे यांची 'हिरवे तळकोकण' एकदा वाचून पाहा... आणि मगच काय ते ठरवा.
निसर्गानुभवापलीकडेही खूप काही तुम्हाला या कवितेतून मिळेल. काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या. आधीच्या पिढीमधील कवींवर कविता लिहिण्याची प्रथा पूर्वी प्रचलित होती. ही केवळ प्रथाच होती, असे नव्हे तर त्या कवीबद्दलचा आदर व्यक्त करण्याची ती शब्दशः काव्यमय पद्धती होती. रीत होती. काव्यमय आदरांजली! 'केशवसुत गातची बसले... ' ही गोविंदाग्रजांची कविता जाणकारांना ठाऊक असेलच.  गोविंदाग्रजांनी केशवसुतांवर कविता लिहिली आणि काटदरे यांनी गोविंदाग्रजांवर.... पिढ्यापिढ्यांना असे जोडत जाणे,  किती काव्यमय आहे! उर्दूतही अशी मोठी परंपरा आहेच.
"रेख्ता के तुम ही उस्ताद नहीं हो ग़ालिब,
सुनते हैं अगले ज़माने में कोई मीर भी था"
हा मीरला मानवंदना देणारा गालिबचा शेर विख्यात आहे.
काटदरे यांनीही गोविंदाग्रजांच्याच धर्तीवर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे, कविवर्य़ ना. वा. टिळक, गोविंदाग्रज, कवी विनायक आदी कविश्रेष्ठांवर कविता लिहून त्यांना नमन केलेले आहे. ऐतिहासिक कवितांमध्ये 'पानपतचा सूड', 'तारापूरचा रणसंग्राम', 'जिवबादादा बक्षी' या त्यांच्या कविता उल्लेखनीय आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या काही कवितांचीही अतिशय प्रासादिक भाषांतरेही काटदरे यांनी केलेली आहेत. ('The Rainy Day या रवींद्रनाथांच्या कवितेचे 'नको जाऊ बाहेर आज बाळा' हे भाषांतरित काव्य याची साक्ष देईल. )

'हिरवे तळकोकण' लिहिणारे काटदरे हे अर्थातच कोकणातील होते.   त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. त्यांची नोकरी कस्टम खात्यात होती.   ते स्वभावाने  अंतर्मुख व  अतिशय भिडस्त. त्यांच्या स्वभावाची ही वैशिष्ट्ये लक्षात घेता ते प्रसिद्धिपराङ्मुखही होते, हे सांगायला नकोच!  
 
काटदरे यांची रचना विलक्षण सुघड, सौष्ठववूर्ण आहे. या त्यांच्या रचनावैशिष्ट्यामुळे कवी चंद्रशेखर यांच्या रचनातंत्राचे अनुयायी (कृपया, हा शब्द ढोबळमानाने घेऊ नये, ही विनंती) असेच त्यांना म्हटले जाई. त्यांच्या रचनेचा हा एक प्रकारे गौरवच होता आणि ही बाब लक्षात घ्यायला हवी.  अर्थात काटदरे यांची स्वतःचीही घाटदार रचनाशैली होतीच. तिचेही सौंदर्य अभ्यासण्याजोगे आहे.
 'ध्रुवावरील फुले', 'फेकलेली फुले' हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत अनुक्रमे १९१५ व १९२१ साली ते प्रकाशित झाले. 'हिरवे तळकोकण' ही कविता १९२१ साली लिहिलेली आहे. माधवांची कविता (१९३५) व गीतमाधव (१९४२) हेही त्यांच्या कवितांचे संग्रह आहेत. काटदरे यांच्या कवितेचा विशेष म्हणजे जुने अनेक सुंदर सुंदर शब्द ते कवितांमध्ये आवर्जून वापरत असत. वापरात नसलेले; पण नेमका अर्थ व्यक्त करणारे शब्द वापरण्याची त्यांची ही खुबी अनेक कवितांमधून आढळते.
* * *
हिरवे तळकोकण...
.......................................


सह्याद्रीच्या तळीं शोभते हिरवे तळकोकण!
राष्ट्रदेविचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन! ।।१।।

झुळझुळवाणे मंजुळ गाणे गात वाहती झरे
शिलोच्चयांतुनी झुरुझुरू जेथे गंगाजळ पाझरे ।।२।।

खेळत खिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे
दरिखोऱयांतुनी माणिकमोती फुलुनी झांकले खडे ।।३।।

नीलनभी घननील बघुनी करी सुमनीं स्वागत कुडा
गोमेदांच्या नटे फुलांनी बरसातिंत तेरडा! ।।४।।

क़डेपठारी खेळ मारुतासह खेळे हिरवळ
उधळित सोने हसे नाचरे बालिश सोनावळ ।।५।।

शारदसमयी कमलवनाच्या तरत्या शय्येवरी
मदालसा स्वच्छंद लोळती जलदेवी सुंदरी! ।।६।।

कविकाव्यांतुनी तशी जींतुनी स्रवते माध्वी झरी
आमोदा उधळीत फुले ती बकुळीची मंजरी ।।७।।

हिरव्या पिवळ्या मृदुल दलांच्या रम्य गालिच्यावरी
स्वप्नीं गुंगत गोकर्णीची फुले निळी पांढरी ।।८।।

वृक्षांच्या राईत रंगती शकुंत मधुगायनी
तरंगिणीच्या तटी डोलती नाग केतकी वनी ।।९।

फूलपाखरांवरुनी विहरती पु्ष्पवनांतिल परी
प्रसन्नता पसरीत वाजवुनी जादूची पावरी ।।१०।।

शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी
रागाने दे बाइलवेडा कवडा भिरकावुनी ।।११।।

रोपे त्यांची बनुनी पसरली नाचत चोहीकडे
अजुनी पाहा या! मंडित त्यांनी कोकणचे हे सडे! ।।१२।।

इतिहासाला वार्ता ज्याची श्रुत नाही जाहली
दंतकथांसही विस्मृती ज्याची होउनिया राहिली ।।१३।।

'
झिम्मा खेळे कोकणचा तो नृपाळ' म्हणती मुली
'
गळे वसंती टपटप जेव्हा आंब्याची डाहळी! '।।१४।।

कुठे आढळे फळभाराने लवणारी आवळी
कुठे गाळिती भुळभुळ अपुली पक्व फळे जांभळी ।।१५।।

कुठे हलवितो पिंपळपाने पिंपळ पारावर
कुठे वडाच्या पारंबीवर झोकें घे वानर! ।।१६।।

कुठे बेहड्यावरी राघूस्तव विरही मैना झुरे
प्राणविसावा परत न आला म्हणुनी चित्त बावरे! ।।१७।।

मधमाश्यांची लोंबत पोळी कुठे सात्विणावरी
रंग खेळती कुठे प्रमोदें पांगारे, शेवरी!   ।।१८।।

पोटी साखरगोटे परी धरी कंटक बाहेरुनी
झुले कुठे तो फणस पुरातन रहिवासीं कोकणी! ।।१९।।

कोठें चिचेवर शठ आंबा करी शीतळ साउली
म्हणुनी कोपुनी नदीकिनारी रातंबी राहिली! ।।२०।।

निर्झरतीरी रानजाइच्या फुलत्या कुंजातुनी
उठे मोहमय संगीताचा अस्फुट कोठे ध्वनी! ।।२१।।

कुठे थाट घनदाट कळकिचा, त्यांत संचरे कुणी
पुंगी बजावित फंदी मुशाफर दर्य़ापुर सोडुनी! ।।२२।।

कुठे सुरंगीमुकुलकुलाच्या सस्मित वदनांतुनी
दरवळलेला परिमळ सेवित फिरती अप्सरा वनी! ।।२३।।

कोरांटीची, नादवटीची, नेवाळीची फुले
फुलुनी कुठे फुलबाग तयांनी अवगे शृंगारिले! ।।२४।।

नीललोचना कोकणगौरी घालुनी चैत्रांगणी
हिंदोळ्यावरी बसविती जेव्हा अंबा शुभदायिनी ।।२५।।
............................................................
 (ही कविता ४१ कडव्यांची आहे. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा