बुधवार, २७ मे, २०१५

स्वातंत्र्यवीर सावरकर

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBKsY4w42Y6WyW0ZYxWfvDgquCQ9Jvv09RULygFjIO0erfq6wXZ31crmnoMJwbIcAXjOF5oHWQ4zjeQ_cBgBneQ_AUb6GWTZk0CQKABsGyHjPvPrYvdt87uqxzj2TjTqPaV2nNoJNYMSe_/s1600/savarkar_3.jpg
वि. दा. सावरकर


 स्वातंत्र्यसैनिकांचे अग्रणी, हिंदू राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञ व हिंदू संघटक, धर्मसुधारक व समाजसुधारक, महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता यांबाबत प्रखर विचार मांडणारे वि. दा. सावरकर यांची आज जयंती. त्या निमित्त..

महाराष्ट्रात नाशिकजवळच्या भगूर गावी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला. तीव्र बुद्धिमत्ता, आक्रमी व साहसी वृत्ती, हृदयातील मानव्य अन् सर्जनशील कवित्व लाभलेले हे बालक वयाच्या 10 व्या वर्षीच इतिहास आणि धर्मशास्त्रावरील जाडजूड पुस्तके वाचू लागले. 10 व्या वर्षी विनायकाने केलेल्या कविता तत्कालीन अग्रणी मराठी वृत्तपत्रात छापून येत असत. मात्र कवीच्या वयावर वाचकांचा विश्वासच बसत नसे. सावरकरांच्या घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. पारतंर्त्य, गुलामी, ब्रिटिश राजवट यांचा थोडाही उपद्रव सावरकरांपर्यंत पोहचला नव्हता. पण..इतिहासाची पाने वाचत असताना सावरकरांच्या मनात राष्ट्रवाद आकार घेत होता. उन्मत्त ब्रिटिश सत्तेशी झगडणार्‍या क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त सावरकरांना अस्वस्थ करू लागले. त्याच काळात रँडचा वध करून फासावर चढलेल्या चापेकर बंधूंच्या बलिदानाने सावरकरांवर फार मोठा आघात झाला. त्याच रात्री देशभक्तीने तळमळलेल्या त्या 16 वर्षाच्या तरुणाने आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली - ‘देशाच्या स्वातंत्र्र्यासाठी शत्रूस मारिता-मारिता मरेतो झुंजेन.. जर यशस्वी झालो, तर माझ्या मातृभूमीला स्वातंर्त्याचा अभिषेक घालेन आणि हरलो तर माझ्या रक्ताचा अभिषेक तिच्या चरणांवर घडेल.’

पुढचा तरुण सावरकरांचा जीवनपट चित्तथरारक प्रसंगांनी भरलेला आहे. अभिनव भारत व मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनांची स्थापना त्यांनी केली. पुण्यामध्ये विदेशी कापडाची होळी केली (1905). उच्च शिक्षणाच्या निमित्ताने ते लंडनमध्ये दाखल झाले. त्याठिकाणी असलेल्या ‘इंडिया हाउस’मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल ¨धग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्‍याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते बॉम्बचे तंत्रज्ञान व 22 ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या 16 वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारतच्या 3 सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंर्त्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता.

सावरकरांनी आपल्या सळसळत्या व्यक्तिमत्त्वाने व ओघवत्या वक्तृत्वाने इंग्लंड आणि भारतातल्या क्रांतिकारकांना झपाटून टाकले. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तत्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली.(1910) ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनार्‍यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना बेकायदेशीरपणे अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे 50 वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली(1911). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण भारताच्या दुर्दैवाने तसे घडले नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खडय़ा बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले. अंदमानातल्या त्या अंधार्‍या खोलीत हा तेजस्वी बॅरिस्टर किडे पडलेले अन्न खात होता आणि मचूळ पाण्याने तहान भागवत होता. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंर्त्य! तब्बल 11 वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते.
बाभळीच्या काटय़ांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.

जीवनाच्या या दुसर्‍या पर्वात समाजसुधारक, हिंदू संघटक, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत अशा अनेक स्वरूपांत सावरकर समाजासमोर आलेले दिसतात. अंदमानातून सुटल्यानंतर तंना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले.
हिंदू समाज संघटित करण्यासाठी सावरकरांनी जे काम रत्नागिरीत केले, ते अतुलनीय आहे. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वण्र्य आणि हिंदूंचा धर्मभोळेपणाच जबाबदार आहेत, हे सावरकरांनी ओळखले. सावरकरांनी असंख्य मंदिरे दलितांना उघडी करून दिली. रत्नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला.
सुमारे 60 वर्षे ‘स्वातंत्र्यवीरांनी’ स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. 1966 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर 22 व्या दिवशी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले. 

गुरुवार, १४ मे, २०१५

शंभू राजे

 शंभू  राजे
शिव रुपाने महाराष्ट्राचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !!
बापाने घडवल्या मुलुखाला पुढे रेटाया आज युवराज धड़कला
सिंहाच्या छाव्याला  जन्मी घालुनी ,सईने पुरंदरी शंभू जोडीला !!
माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शंभू लहापणीच संकटाशी भिडला !
युवराज असुनही त्या दिवासी शंभू एकाकी पडला
कळण्या आधिच आईचा पदर सरला !!
धाराऊ दुधाने बाळ शंभू सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्या तोलानेच तयाने भगवा हाती धरला !
एक समयी पाच पाच मोहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत शंभूराजा अवघ्या मुलुखाची शान बनला होता !!
रायगडाच्या होळी माळावर उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता !
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शंभू सारी हिरवी धगड़ फोडत होता !!
गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान स्वकीयांनीच त्याचा घाट रचला होता,
पैश्यापाई त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता !
सर्वाना पुरून उरनारा शंभू राजा म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!
डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता !
कवडयाच्या माळीवर हात घालणार्‍यावर
त्या आवस्तेतही शंभूराजा भडकला होता !!!
पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हणूनच की काय तिला हा वीर स्वर्गातच पाहिजे होता !
शिवाने दिलेल्या शपतेपाई शंभूराजा महाराष्ट्र धर्मासाठी बेचाळीस दिवस लढला ,
मरता मरताही भगवा कवटाळत शंभू राजाने ” जगदंब ” म्हणत हिंदवी शब्दच उच्चारला होता……. !!!

रविवार, ३ मे, २०१५

माणसाशी वैर करण्यापूर्वी बुद्ध आठवा...........

माणसाशी वैर करण्यापूर्वी बुद्ध आठवा...........

आज वैशाख बुद्ध पौर्णिमा. जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांची जयंती. हा मंगल दिन बौद्धधम्मावर प्रेम आणि आस्था ठेवणाऱ्यांसाठी महापर्व समजला जातो. वैशाख पौर्णिमेलाच बुद्धांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिब्बाण या तीन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. जगातील कोणत्याच महापुरुषाचा बाबत अशा घटना घडल्या नाहीत. शाक्यमुनी तथागत बुद्ध जगाला प्रकाश देणारे तेजस्वी सूर्यच...

कपिलवस्तूची महाराणी महामाया देवी आपल्या माहेरी देवदह येथे जात होती. तेथेच नेपाळच्या पायथ्याची वसलेल्या लुम्बिनी वनात तिने ख्रिस्तपूर्व ५६३ साली बाळाला जन्म दिला. बालकाचे नाव 'सिद्धार्थ' ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या वडिलांचे नाव शुद्धोदन होते. सिद्धार्थाच्या जन्मानंतर सात दिवसानंतरच त्याच्या आईचा मृत्यू झाला. सिद्धार्थाची मावशी गौतमीने सिद्धार्थाचे पालनपोषण केले. सिद्धार्थाने गुरू विश्वमित्रापासून वेद आणि उपनिषदाचा अभ्यास केला. राजकाज आणि युद्धविद्याचे धडे घेतले. कुस्ती, घोडेस्वारी, धनुष्यबाण आणि रथ हाकण्यात ते तरबेज झाले. लहानपणापासूनच सिद्धार्थाचे मन करुणेने ओथंबलेले होते. त्याला कोणत्याही प्राण्याचे दुःख, वेदना बघवत नव्हत्या.
बोधगया येथील विशाल पिंपळवृक्षाच्या शीतल छायेखाली सिद्धार्थाने घोर तपश्चर्या करून सम्यक सम्बोधी प्राप्त करून घेतली. तो पिंपळवृक्ष आजही आहे. आज ताे 'बोधीवृक्ष' म्हणून ओळखला जाताे. या वृक्षाला वाचविण्यासाठी, वृक्षाच्या परीक्षणासाठी दरवर्षी विदेशातून नामांकित वैज्ञानिक बोधगयेला येतात. वृक्षाची आयुमर्यादा वाढविण्याचे उपाय सांगतात. या बोधीवृक्षाला जागतिक वारसा सूचीमध्ये स्थान मिळाले आहे. सम्राट अशोकाने या वृक्षाची एक शाखा पुत्र महामहिन्द, पुत्री संघमित्ता यांच्यासमवेत श्रीलंकेला पाठविली होती. तेथेही हा वृक्ष आहे. बुद्ध जयंतीला जगभरातील यात्रेकरू या वृक्षाखाली एकत्र येतात आणि 'जयश्री महाबोधी' म्हणत या वृक्षाचा जयजयकार करतात.
४५ वर्षे सारख्या प्रवासाने, कष्टाने तथागतांचे शरीर दुबळे झाले होते. वयानेही ऐंशीचा टप्पा गाठला होता. आराम नावाला नव्हता. ते मगध देशातून कोसलकडे निघाले. वाटेत पावा येथे भिक्खूसंघासह थांबले. तेथे चूंद नावाचा लोहार त्यांचा भक्त होता. त्याने तथागतांना आपल्या घरी जेवण दिले. त्या जेवणाने तथागत आजारी पडले. तशाही अवस्थेत ते पुढे निघाले. नदी पार करून मल्लांच्या आताच्या उत्तर प्रदेशातील कुसीनगर गावी पोहोचले. आपला अंतःकाळ जवळ आलेला पाहून तथागतांनी शिष्यांना जवळ बोलावले. त्याचवेळी सुदत्त नावाच्या ब्राह्मणाला तथागतांचा उपदेश ऐकावयाचा होता. 'मी शेवटचा श्वास घेईपर्यंत लोकांना खरा धम्म सांगत राहील' असे उद्गार काढून तथागतांनी त्याला धम्मोपदेश केला. तोच बुद्धांचा अखेरचा शिष्य. वैशाख पौर्णिमेलाच रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागतांचे महापरिनिब्बाण झाले.
तथागत बुद्ध अंतिम समयी म्हणाले, 'माझ्या प्रिय शिष्यांनो, मी तुम्हाला सोडून जात आहे म्हणून दुःख करीत बसू नका. ही ज्योत एके दिवशी विझणारच होती. मी तुम्हाला धम्माचा दीप उजळून दिला आहे. त्या दिव्याच्या प्रकाशात तुम्ही आपले कर्तव्य करीत राहा. लोकांची सेवा करा. त्यांना सुखी करा.' हेच त्या महामानवाचे शेवटचे बोल होते. 'चरथ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय' असा संदेश देणाऱ्या तथागतांनी उजळलेला धम्मदीप आज शेकडो वर्षे झाली तरी प्रकाशवाट दाखवित आहे. जगातील ५० कोटींहून अधिक जनतेला त्याचा प्रकाश मिळत आहे.
बुद्ध जयंतीला बौद्ध विहारे, स्तूप, दर्शनीय स्थळे विद्युत रोशनाईने न्हावून निघतात. बोधीवृक्षाची पूजा केली जाते. बौद्ध उपासक घरोघरी दीप प्रज्वलित करून सुगंधित फुलांनी घर सजवितात. धम्मग्रंथांचा सुबोध पाठ भदन्ताचार्याद्वारा केला जातो. बुद्धमूर्तीसमोर सुगंधित पुष्पे, फळे अर्पण केली जातात. बुद्धाचे हजारो अनुयायी लुम्बिनी, बोधगया, सारनाथ, कुसीनगर आणि आधुनिक सारनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरातील दीक्षाभूमीच्या दर्शनाला येतात. दिल्ली संग्रहालय या दिवशी तथागत बुद्धांचा पवित्र अस्थीकलश जनतेच्या दर्शनासाठी ठेवतो.
भारतासोबतच नेपाळ, चीन, जपान, तायवान, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार आणि इंडोनेशियात बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम आयोजित केले जातात. पाश्चात्य देशात एकजीव झालेल्या संस्कृतीनुसार, परंपरेनुसार बौद्ध महोत्सवाचे आयोजन केले जाते. श्रीलंका आणि इतर दक्षिण पूर्व आशियाई देशात हा दिवस 'वेसाक' नावाने साजरा केला जातो. भारतात हा दिवस बुद्ध पौर्णिमा, वैशाख पूजा नावाने तर भारताबाहेर हा दिवस विसाख बुवा, सागादाव, फो देन, फॅट डॅन नावानेसुद्धा स्मरण केला जातो.
ब्रह्मदेशात बर्मी महिन्यानुसार कसो नावाच्या महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी (वैशाख पौर्णिमा) बुद्ध जयंती, बोधिसत्व प्राप्ती दिवस आणि महापरिनिब्बाणच्या रूपात साजरा केला जातो. या दिवशी सकाळी प्रत्येक नगरातील, प्रत्येक गावातील उपासिका नवीन वस्त्र धारण करून कलशात पाणी भरून जांभूळाची ताजी पाने आणि अक्षत पुष्पादीने सजवून जलकुंभ डोक्यावर ठेवून शिस्तबद्ध रांगेने बौद्धविहारात जातात. धम्मगुरूंचा उपदेश श्रवण केल्यानंतर उपासिका पुन्हा जलकुंभ डोक्यावर घेऊन बोधीवृक्षाला श्रद्धापूर्वक परिक्रमा करतात. बोधीवृक्षाला जलार्पण करून बुद्धाची विधीवत पूजाअर्चा करतात. भारतभूमीने बुद्धासारखा महाप्रज्ञावंत जगाला दिला. म्हणूनच आशिया खंडातील अनेक देशातील लोक बुद्धभूमीकडे पाय करून झोपत नाही. दररोज सकाळी उठल्याबरोबर तथागतांचे स्मरण करून त्यांना त्रिवार वंदन करतात. तथागतांचा महान उपदेश सर्वांसाठी नेहमीसाठीच असतो. गरीब, श्रीमंत, पापी, पुण्यवान सर्वांना उमजेल असा साधा सोपा धम्म बुद्धाने सांगितला.
न हि वेरेन वेरानि सम्मन्तीध कुदाचनं ।
अवेरेन हि सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ।।
माणसाने माणसाशीच वैर करावे हे पाहून बुद्धांना मनस्वी दुःख होत असे. वैर टाकून सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने, सौजन्याने, सहानुभूतीने वागण्याचा त्यांनी संदेश दिला. तथागताची ती थोर शिकवण त्यावेळीही लोकांना पटली होती. आजही प्रेरक ठरत आहे.

-मिलिंद मानकर
साभार महाराष्ट्र टाइम्स