रविवार, १२ एप्रिल, २०१५

कोल्हा रानमांजर आणि ससा

 कोल्हा रानमांजर आणि ससा

 एक लहानसा भित्राससा एका बिळात राहात असे; त्याने एके दिवशी, कोल्हा आपणास धरून मारून खाण्यासाठी बिळाच्या तोंडावर टपून बसला आहे असे पाहिले. परंतु बिळाचे तोंड लहान असल्यामुळे त्यातून कोल्ह्यास आत येणार नाही, हे पाहून, सशाचे भय थोडेसे कमी झाले. पुढे एके दिवशी, कोल्हा एका रानमांजराबरोबर मोठया सलगीने बोलत बसला आहे, असे त्याच्या दृष्टीस पडले. हे चिन्ह काही बरे नाही, असे त्यास वाटले. थोडया वेळाने, ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्यास आपल्या पंजांनी असे ओरबाडू लागले की, सशास आपला जीव वांचविण्यासाठी बिळातून बाहेर पडावे लागले! तो तेथे कोल्हा बसलाच होता, त्याने त्याजवर झडप घालून त्यास पकडले व रानमांजरासह त्याच्या मांसावर ताव मारण्यास सुरवात केली. मरतेवेळी ससा म्हणाला, `तुम्हा दोघा लुच्चांची मैत्री झाली असे जेव्हा मी पाहिले, तेव्हाच आपली आता धडगत नाही, अशी माझी खात्री होऊन चुकली होती.'

तात्पर्य :- एकमेकांशी शत्रुत्व करणाऱ्या दोन मनुष्यांची मैत्री झाली, की एखादया गरीबावर धाड आलीच म्हणून समजावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा